लहरी

Wednesday, January 25, 2006

धरणीमातेचे स्मशान

Temp

Wednesday, January 18, 2006

चौक

ए थांब ! ए थांब !
(जो~यात शिट्टी)
अरे कुठं पळतोयस्... हळू कर .. हळू कर...
आस्सं.....
(किल्ली मामाच्या ख़िश्यात)
ये जरा बाजुला... ढकलत आण चल !

मामा: कारे तुझ्या ... ऎकू येत नाय का पहिल्यांदा ?
तो१: काका, मला वाटलं की तुम्ही मागच्या स्कूटी वाल्या बाईंना हाक मारली
मामा: पन शिट्टी पन मारली की मी...
तो२: अहो, म्हणुन तर आम्हाला असं वाटलं ना.
मामा: (विनोद न कळुन) लाइसन काढा लाइसन.
(तो१ मागे सरकतो आणि तो२ पुढे सरसावतो.)
तो२: हा घ्या.
मामा: (शांतपने !) तुमाला विचारलं का मी ? तुम्ही मागे बसला होता ना. मग चला मागे. आस्सं.
तुम्ही या पुढं.
(तो२ मागे सरकतो आणि तो१ थोडासा अडखळत पुढे होतो)
मामा: (थोडावेळ थांबून, थोडंसं चिडल्याचं दाख़वून) अहो, लाईसन दाख़वा की.

(तेवढ्यात मामा२, दोन गाड्या व दोन गाडी चालक ('ती'-वय अंदाजे २०, 'त्या'-वय अंदाजे ३५) यांचे तिथे आगमन होते.)
मामा२: जरा यांना बघा. येलो तोडलाय. आणि यांच्याकडे पीयूसी नाही. मी जातो परत सिंगल ला. या घ्या यांच्या चाव्या.
मामा: हो का ? बरं मॅडम या इकडं. ओ, तुम्ही लाईसन काढा की.
तो१: (घाबरण्याचे नाटक करुन) काका, मी एक विद्यार्थी आहे हो... माझी परिक्षा आहे हो आत्ता काही वेळात, ती झाली की येताना लाईसन्स दाख़वतो. चल रे, उशिर होतोय आपल्याला.
(असे म्हणुन सटकू लागतो. "अरे विनोद, सटकू चल, उभा का आहेस ?")
तो२: (हळु आवाजात) अरे मठ्ठ, किल्ली त्याच्याकडे आहे.
(तो१ मागे फ़िरतो)

(मामा इतका वेळ शांतपने बघत असतो)
मामा: स्टुडंट ?? इकडे या. नाही इकडे या तुम्ही.
कुठलं कालेज ?
तो१: (चाचपडत) NA Chillampalli New Morning Law College.
मामा: मराठीत बोल.
तो१: अहो मराठीतच आहे, nanasaheb appraao chillampalli new morning law college !
मामा: ये, मराठीत बोल की.
तो२: (उपहासाने) अहो, नानासाहेब अप्पाराव चिल्लमपल्ली नवीन प्रातर्विधी महाविदयालय, हडपसर.
मामा: (नेहमीप्रमाणे विनोद न कळून)ऑ, कधी ऎकल्याचे आठवत नाही. आणि सप्टेंबर ला कुठली रे परिक्षा तु‍झी ?
तो१: (अडख़ळत) अहो, प्रॅक्टिकल आहे.
मामा: मग असु द्या. परत द्या परिक्षा कधीतरी. चला लाईसन दाख़वा चला.

(तिकडे 'त्या' मोबाइल वर कॉल लावतात)
इकडे मामा: ('ती' ला)बोला मॅडम, तुमचं काय ? अहो तुमाला लाइसन कोणी दिला ? येलो चा अर्थ कळतो का ? तुमच्यासारख्या सुशिक्षीत लोकांनी येलो तोडणं बरं दिसतं का ?
ती: (गोड आवाजात) ओ काका, त्याचं काय झालं नं, मला दुरुन दिसला तेंव्हा तो ग्रीन होता हो. आणि येलो कधी झाला ना ते कळलंच नाही !
('ती' ला पाहून तो२ पुढे सरसावतो)
तो२: हो ना, तो लाइट ना असाच फ़सवतो. 'दुरुन सिग्नल ग्रीन' म्हणतात ते काही उगाच नाही. बाय द वे, आय एम विनोद देशमुख, बी. एस्सी. थर्ड इयर.
(मामा शांतपने त्याच्याकडे बघतो)
तो२: (घाइने) सॉरी सॉरी, बी. लॉ. थर्ड इअर. (जीभ चावून) आपलं, एल. एल. बी., थर्ड इअर.
(आणि ओशाळून माघार घेतो)

(तिकडे 'त्यां' नी मोबाइल वर जगदंबेचा अवतार धारण केलेला असतो.)
त्या (पलिकडील माणसास): किशोर ! मी तुला किती दिवसांपासुन सांगतेय की पीयूसी करून आण माझ्या गाडीचा. आता इथे, मला फ़ुकटचे ४०० रुपये दयावे लागतील. तुला ना सांगितलेलं एक धड काम जमत नाही, युझलेस !!! (आणि मोबाइल बंद करतात).
('त्यां' चा अवतार बघुन मामा जरा खाली येतो.)
मामा: अहो मॅडम, पीयूसी सारखी महत्वाची कामे नोकरांना नाही दयायची.
त्या: (तोच अवतार) तोंड सांभाळुन बोला !! नोकर कोणाला म्हणताय ?? मी माझ्या मिस्टरांशी बोलत होते.
मामा (मनात): मिस्टरांशी अशा बोलतात. जरा दमानं घ्यायला हवं.
मामा: मग, आता काय करायचं मॅडम.
त्या: अहो तुम्ही जास्ती गोल गोल फ़िरु नका. जे किती घेता ते सांगा. किती रेट असतो तुमचा पीयूसी तोडण्याचा ?
(असं बाईंनी चार चौघात डाइरेक्ट बोलल्यामुळे मामा एकदम कावरा बावरा होतो.)
मामा: (चिडण्याचा अविर्भाव आणुन) ओ मॅडम ! तुम्हाला काय वाटलं ? नियम काय विकाऊ आहेत ? चला दया १००० रुपये, पावती फाडतो.
(असं म्हणून हातातल्या पावती पुस्तकाशी खेळायला लागतो)
(या मामा लोकांचा आंगिक अभिनय उच्च दर्जाचा असतो.)
त्या: (१००० चा आकडा ऐकून जरा विचार करतात) त्याचं काय झालं ना भावजी ('भावजी' वर जोर), माझा पीयूसी परवाच एक्स्पायर झाला हो आणि त्यात माझ्या सास~यांची तब्येत जरा बरी नाही हो आजकाल. मला ना मुळी वेळच मिळत नाही हल्ली.
मामा: (स्वत:वर खुश होऊन) ठीक आहे, ठीक आहे. जरा बाजुला या. ओ तुम्ही दोघे (तो१ आणि ती यांना उद्देशुन), चला पावती फाडायला आलोच ५ मिन्टात. तुम्ही ८०० आणि तुम्ही १०००. काय ?

(मामा 'त्यां' च्या बरोबर जरा बाजुला होतो. त्या दिशेने ३००, ५०, २५०, १००, २०० असे काहीतरी ऐकू यायला लागते. लगेच त्या पर्स मधून पैसे काढून मामा ला देतात. मामा किल्ली देतो आणि त्या निघुन जातात.
'त्यां' नी २०० रु. दिलेले पाहून तो१, तो२ आणि ती, तिघेही विचार करायला लागतात.
मामा मिश्या पिरगाळत येतो.)

ती: (गोड आवाजात) अहो काका, मला ना खरच ना नाही दिसला हो यलो. आई शप्पथ ! मी ना अशी सरळ येत होते ग्रीन पाहत.
मामा: काय सांगता ? तुम्हाला काय चश्मा आहे ?
ती: नाही हो, लेन्स आहे.
मामा: (चिडून) अहो, तेच ते हो. तुम्हाला येलो कसा नाही दिसला मग ?
ती: नाही ना दिसला !
मामा: (वैतागून) खरच नाही दिसला ??
ती: अ हं !!
मामा: नक्की ??
ती: हो ना !!
मामा: आई शप्पथ ?
ती: तुमच्या आईची शप्पथ !!
मामा: (चिडून) माझी आई काढू नका ! ठीक आहे जा. आणि हे बघा, परत कधी सापडलात येलो तोडतांना तर लक्षात ठेवा, २०० रू (जीभ चावून) आपलं ८०० रू द्यावे लागतील. चला फ़ुटा आता.

(तो१ मनात मामाला अती उच्च शिव्या द्यायला लागतो.
मामा 'ती' ला किल्ली देतो. ती गाडीवर टांग टाकून निघून जाते. तो२ तिच्याकडे ती दिसेनाशी होईपर्यंत बघतो.
इकडे तो१ च्या मामाला आठवतील तेवढ्या शिव्या देऊन झालेल्या असतात.)
तो१: अरे गेली ती ! ओय चल, देऊन टाकू २०० आणि जाऊ चल.
तो२: च्यायला .. आणि पिच्चर काय स्टॉल मध्ये बसून बघायचा ? थांब मी अजून प्रयत्न करतो.

तो२: अहो काका, प्रॅक्टिकल ला १५ मिनीटेच उरलीत हो. जाऊ द्या ना.
मामा: (शांतपने) लॉ ला कुठलं प्रॅक्टिकल ?
तो२: (थोडा विचार करून) अहो काका, माझं प्रॅक्टिकल आहे, मी सायन्स ला आहे. हा लॉ चा आहे आणि मला पोचवायला येतोय.
मामा: (चिडून. या मामा लोकांना अशी चिडण्याची अक्टिंग दिवसातून बरेचदा करावी लागते.) अहो तुम्ही लॉ चे स्टूडंट असून असे दिवसा ढवळ्या लॉ तोडतांना लाज नाही वाटत ?
तुम्हा आजकालच्या पोरांना काहीच कशी जाणीव नसते ? आमचा वेळला असं नव्हतं.
(दोघेही मान खाली घालून पश्चात्तापाचा आव आणतात. दोघांच्याही मनात अर्धी लढाई जिंकल्याचे विचार.)
मामा: चला ६०० रू. काढा पटापट.
(तो१ परत मनात मामाला अती उच्च शिव्या द्यायला लागतो.)
तो२: काका, तुम्हाला मि. पाटील माहिती आहेत का मुख्य ऑफ़िसातले अधिकारी?
मामा: (संशयाने) हो. का ?
तो२: मी त्यांचा पुतण्या सॉरी भाचा. माझं नाव विनोद बेहेरे. हे बघा माझं नाव. (असं म्हणुन स्वत:चा लाईसन्स त्याला दाखवतो)
(त्याचक्षणी मामा खाडकन सॅल्यूट करतो !
आपली क्लुप्ती इतक्या लवकर चालली याचा आनंद होऊन तो२ स्वत:वरच खुश होतो.
पण तो सॅल्यूट आपल्याला नसुन आपल्या मागून जाणा~या लाल दिव्याच्या गाडी ला आहे हे त्याला लगेच कळते )
मामा: (डोकं खाजवत) काय ? तुमच्या काकांचे आपलं मामांचे नाव काय ?
तो२: मामासाहेब पाटील.
मामा: अरे नाव काय ?
तो२: मामासाहेब पाटील.
मामा: अरे खरं नाव काय तुझ्या त्या मामाचं ?
तो२: (अब आया उंट पहाडके निचे. चिडून) ओ, तुम्हाला काय हे खोटं नाव वाटलं काय ? आपल्या साहेबांविषयी असं बोलतांना लाज नाही वाटत ? आत्ता मामा साहेबांना फोन करुन तुमची कंप्लेंट करतो. मगाचपासून तुम्ही हे जे काही चालवलंय ना ते बघतोय आम्ही म्हंटलं. (आवाज चढवून, आजूबाजूच्यांना एकू जाईल अशा बेताने) तुम्ही जे पैसे उकळताय ना लोकांकडून त्याबद्दल मी जर मामासाहेबांना सांगितलं तर तुमची बदली करतील ते.
(आजूबाजूचे लोक बघायला लागतात, मामाला घाम सुटतो
पण तो२ थांबत नाही)
तो२: आता बघा तुम्ही मी काय करतो ते. आत्ता मामासाहेबांना फोन करतो आणि सगळं सांगतो. बघा आता तुम्ही.
(असं म्हणून मोबाइल ची बटन्स दाबायला लागतो).
मामा: अहो ऎका ऎका. माझं ऎका. तुमच्या मामासाहेबांना का आनताय मधे ? अहो मी एक प्रामाणिक सरकारी नोकर आहे. माझी थोडी गैरसमजूत झालेली. हे घ्या तुमची किल्ली.
(मामा झटकन किल्ली काढून देतो. आजुबाजुचे लोक पांगतात. मामाला हायसं वाटतं. तो तिथुन पळ काढतो.)

तो१ आणि तो२ अगदी दिमाखात गाडी स्टार्ट करतात आणि निघतात.
तो१: सही रे !! कसलं घेतलंस त्याला !
तो२: मग, अपून का भी नाम विनोद बेहेरे है. चल पटकन शो ची वेळ झालीये.
तो१: अरे, बघ परत एक सिग्नल आलाय. काय करायचं ?
तो२: काय करायचं ? तोडायचा अर्थात. गो गो !
तो१: ओके, कूल ! हिअर वी गो !


ए थांब ! ए थांब !
(जो~यात शिट्टी)
अरे कुठे पळतोयस... हळू कर .. हळू कर...
आस्सं.....
(किल्ली मामाच्या ख़िश्यात)
ये जरा बाजुला... ढकलत आण चल !
मामासाहेब पाटील ला कोणी हूल देऊन पळु शकत नाही म्हटलं.