लहरी

Saturday, April 10, 2010

२१व्या शतकातले काव्य

नुकतेच "२१ व्या शतकातील काव्य" या काव्य प्रकाराला अधिक्रुतपणे मराटी साहित्याचा एक प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली. त्या निमित्ताने या काव्यप्रकाराचे विश्लेषण.


सकाळी उठून बघतो,
तर कुठे फ़्ल्यू, कुठे बॉंब.
शेवटी फ़ेकला पेपर,
नेमका एक झुरळ चिरडला गेला.


या प्रकाराला २0व्या शतकातले काव्य म्हणतात.
तर -
सकाळी उठून बघतो,
तर कुठे फ़्ल्यू, कुठे बॉंब.
शेवटी फ़ेकला पेपर,
आणि 'पुणे टाईम्स' हातात घेतला


या प्रकाराला २१व्या शतकातले काव्य म्हणतात.


या काव्यप्रकाराचा उगम सुमारे इसवी सन २००० साली झाला असावा असे जाणकार लोकांचे म्हणणे आहे. तिस~या सहस्त्रकात प्रवेश केल्यावर मानवी जीवनात जी नवी नवी स्थित्यंतरे झालीत त्याचे ज्वलंत चित्रण यात आपल्याला दिसुन येते.


एका निनावी कवीने केलेली ही अजरामर कविता आपण आता बघुयात.

हा बघा कवी (२१ व्या शतकातला),
आणि ती त्याची कविता (२१ व्या शतकातली)
तो आणि ती सीसीडी मधे भेटतात ,
आणि क्षणात एकमेंकाच्या प्रेमात पडतात

तो तिचा, ती त्याची, त्यांचा जमतो मेळ
पहिलीच भेट खुप वेळ.
नंतर दोघेही परत भेटायचं ठरवतात,
मोबाइल नं. दिले घेतले जातात.

२ महिन्यांनी परत दोघे सीसीडी मधे,
मात्र टेबल्स वेग वेगळी,
आणि,
त्याची 'ती' आणि तिचा 'तो' पण


या कवितेने ख~या अर्थाने "२१व्या शतकातल्या काव्यप्रकार"ची चळवळ सुरु झाली.


२०व्या शतकातल्या काव्यप्रकारापेक्षा २१व्या शतकातल्या काव्यप्रकार हा रस, अर्थ आणि रंग या तिन्ही बाबतीत अनुक्रमे सरस, सअर्थ आणि सरंग आहे. काही वात्रट समीक्षक यापुढे "सवंग" असे जोडतील, पण त्यांकडे स‍जाण (का सु‍जाण ?) वाचकांनी लक्ष देऊ नये.

या काव्यप्रकारावर २१ व्या शतकातल्या जाणिवेचा प्रभाव तर आहेच, पण यात प्राचीन, अर्वाचीन आणि अक्साई चीन या तिन्ही संस्क्रुतींचा सुद्धा सुंदर मिलाप आढळतो. आता तुम्ही म्हणाल, २१व्या शतकातल्या काव्याचा जुन्या संस्क्रुतींशी काय संबंध ?

आता हेच उदाहरण पहा:

आम्हीच आमचे भाग्यविधाते,
आम्ही घालणार फाटक्या जीन्स, मिनी
आम्हीच करणार पुलाव स्वत:साठी,
आणि त्यात घालणार दालचिनी

आता दालचिनी आणि प्राचीनी(शिवाय अर्वाचीनी आणि अक्साई चीनी) संस्क्रुतीचा किती जवळचा संबंध आहे, हे सांगायची गरज नाही. शिवाय "आम्हीच करणार पुलाव स्वत:साठी" यामधून २१ शतकातल्या तरूण पिढीचा स्वावलंबी पणा दिसुन येतो.


थोडक्यात, हा नवा काव्यप्रकार एक नवीन प्रकारची (२१ व्या शतकातली) क्रांती समाजात आणेल यात शंका नाही.

पुढच्या भागात आपण पाहू २१व्या शतकातल्या काव्याची आणखी काही उदाहरणे.